अहमदनगर -रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला सुमारे पावणे आठ लाखाचा अवैध धान्य साठा कोतवाली पोलीस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केला. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर पोलिसांनी छापा टाकून धान्य व सहा वाहने मिळून सुमारे ४२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी मार्केट यार्डमधील २ दुकाने व केडगाव येथील संबंधित गोडाऊन सील केले आहे.
सहा जण पोलिसांच्या ताब्यात -
या दोन्ही प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये सुरेश रासकर, संग्राम रासकर, आसाराम रासकर, व्यवस्थापक जालिंदर चितळे यांच्यासह दोन वाहन चालक आशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी ४१९ गोण्या तांदूळ व १२५ गोण्या गहू असा माल मार्केट यार्ड येथील दुकानातून जप्त केला. तर केडगाव येथील गोदामात १३२ गोण्या तांदूळ, २४७ गोण्या गहू व बारदाण्यात गहू भरलेल्या ४७ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा सगळा धान्यसाठा हरियाणा व मध्यप्रदेश राज्यातील रेशनिंगचा आहे. पोलिसांनी या धान्यासह रेशनिंग धान्याच्या रिकाम्या गोण्या, ४ ट्रक व एक छोटा हत्ती वाहन, एक पिकअप वाहन असा सर्व मिळून ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
माहिती मिळताच पोलीस, पुरवठा विभागाने केली कारवाई-
नगर शहरामध्ये रेशनचा गहू व तांदूळ सर्रासपणे काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी अवैधरित्या साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती पोलीस व महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर मार्केट यार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडीग कंपनी या दोन्ही दुकानावर आधी छापा टाकण्यात आला. हे दोन्ही दुकाने सुरेश रासकर यांच्या नावावर आहेत. पोलिसांनी या ठिकाणी मुद्देमाल हस्तगत करून त्या ठिकाणी असलेली बिलांची तपासणी सुद्धा सुरू केली आहे. ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत.