अहमदनगर- जामखेड तालुक्यातील आपटी ग्रामपंचायतचा माजी सरपंच व भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी नंदू प्रकाश गोरे (वय 31) याच्यावर एमपीडीए व मकोका कायाद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याची रवानगी आता नाशिक मध्यवर्थी कारागृहात होणार आहे.
याबाबत जामखेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यातील धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर, अवैध धंदे, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, कुविख्यात गुन्हेगार यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत तत्कालीन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत.
त्याअनुषंगाने जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी जामखेड येथील धोकादायक व्यक्ती म्हणून तालुक्यातील आपटी येथील नंदू गोरे याच्यावर सन 2015 ते 2020 या कालावधीमध्ये जामखेड पोलीस ठाण्यामध्ये हाणामारी, बेकायदा शस्र घेऊन फिरणे, धमकावणे, असे विविध प्रकारचे सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.