शिर्डी :कोरोना निर्बंध शिथील केल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरं खुली करण्याच्या मागणीवरून आता राज्यात राजकारण होताना दिसत आहे. अनलॉकनुसार शिर्डी येथील साईबाबांचे मंदिरही सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने 5 एप्रिल 2021 रोजी शिर्डीतील साई मंदिर बंद करण्यात आले होते.
साई मंदिर खुले करा, अन्यथा आंदोलन करू; भाजपचा इशारा देशातील मंदिरे सुरू, शिर्डी का बंद?
देशभरातील तिरूपतीसारखी देवालये सुरू असताना शिर्डीसारखे देवालय कुलुपबंद आहे. मंदिर उघडण्यासाठी आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी आंदोलन करूनही यासंदर्भात सरकार दूर्लक्ष करत असल्याचा आरोप तांबे यांनी केला आहे. शासनाने लसीकरण झालेल्या तसेच कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक असलेल्या साईभक्तांना नियम व अटींच्या अधीन राहून साई दर्शन घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. साईदर्शनासाठी आतुर झालेल्या भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा आणि अर्थकारणाचा रुतलेला गाडा सुरळीत व्हावा अशी मागणी शिर्डी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांनी केली आहे.
पहिल्या लाटेत मंदिर उघडण्यासाठी आंदोलन
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान साईबाबा मंदिर भाविकांच्या दर्शानासाठी उघडण्यासाठी 13 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिर्डीत येऊन साई मंदिराच्या चार नंबर प्रवेश द्वारासमोर मंदिराच्या कलशाला साष्टांग दंडवत घालत साईबाबांनीच राज्य सरकारला मंदिरे उघडण्याची सद्बुद्धी द्यावी असे साकडे घातले होते. त्यानंतर एक महिन्याने भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी 13 ऑक्टोबर 2020 ला शिर्डीत धरणे आंदोलन केले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही उपस्थिती लावली होती. 25 ऑक्टोबरला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शिर्डीत घंटानाद आंदोलन केले होते. 5 नोहेंबरला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी आंदोलन केले होते. त्या नंतर 16 नोव्हेंबरला दिपावली पाडव्याच्या दिवशी साईंचं मंदीर कोरोना नियमांचे पालन करत भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.
दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच आंदोलन
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यानंतर 5 एप्रिल रोजी साई मंदीर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत मंदिर बंद आहे. आता राज्य सरकार हळूहळू राज्यातील सर्वच व्यवहार सुरू करत आहे. मात्र मंदिर खुले करण्याचा निर्णय राज्य सरकारने न घेतल्याने मंदीरे उघडण्यासाठी भाजपकडून आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांच्या नेतृत्वात साई मंदिर परिसरात साकडं आंदोलन करण्यात आलं आहे. मंदिर पुन्हा उघडण्याच्या मागणीसाठीचे 5 एप्रिलनंतरचे हे पहिलेच आंदोलन आहे.
व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
साईबाबा मंदिर बंद असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीचं संपुर्ण अर्थकारण ठप्प झालं आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकाकडून जप्तीच्या व वीज महामंडळाकडून वीज तोडणी कारवाई केली जात आहे. तर नगरपंचायतकडूनही करासाठी तगादा लावला जात असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. त्यामुळे मंदिर पुन्हा सुरू झाले तरच आर्थिक चक्र सुरू होऊन यातून सुटका होईल या अपेक्षेने व्यावसायिक मंदिर उघडण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, पहिल्या लाटेनंतर मंदिर सुरू करण्यासाठी जशी तयारी करण्यात आली होती तशीच तयारी सध्या मंदिर प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे पुन्हा मंदिर सुरू होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -राज्य सरकारला मंदिरांपेक्षा मदिरेची चिंता, प्रवीण दरेकरांची टीका