अहमदनगर - आचारसंहिता लागून निवडणुकांची घोषणा झाली नसली, तरी सत्तेतील आणि विरोधातील सर्व पक्ष यात्रांच्या निमित्ताने जनतेच्या मनोरंजनासाठी मैदानात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या यात्रा असल्याने भाषणांचे चांगलेच युद्ध पेटले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राम शिंदेंना मंत्रिपद देतो, अशी घोषणा केली असून मंत्री करायला ते निवडून तर आले पाहिजे ना! असा टोला जयंत पाटीलांनी लावला आहे.
राम शिंदेंना पुन्हा मंत्री करायला ते निवडून तर आले पाहिजेत; जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला - shivswarajyayatra
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात राम शिंदेंच्या कामाचे कौतुक केले असून पुढील मंत्रिमंडळात ते पुन्हा मंत्री असतील याची ग्वाही दिली आहे. मात्र, मंत्री व्हायला राम शिंदे निवडणूक तर आले पाहिजे, असा टोला जयंत पाटीलांनी लावला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महाजनादेश यात्रा आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली शिवस्वराज्य यात्रा एकाच दिवशी जामखेडकरांच्या भेटीला दाखल झाल्या. विशेष म्हणजे यानिमित्ताने आयोजित दोन्ही यात्रांच्या जाहीर सभेची वेळ ही दुपारी चार वाजताची होती. यामुळे साहजिकच जामखेड शहर आणि पंचक्रोशीत वातावरण भाजप - राष्ट्रवादीमय झाल्याचे रस्तोरस्ती दिसून येत होते. दोन्ही पक्षाचे झेंडे, बॅनर-होर्डिंग्ज एकमेकाला खेटून दिमाखात लावलेली होती. तर सभास्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. या परिस्थितीत एकमेकांच्या विरोधात असलेल्या दोन्ही पक्षांचे हजारो कार्यकर्ते एकाच परिसरात असताना, पोलीस-प्रशासनाने सुनियोजित नियोजन करून कायदा व सुव्यवस्था बिघडू न देण्याची किमया लीलया पार पाडली. एकंदरीतच या परिस्थितीत दोन्ही बाजूने होणाऱ्या जाहीर सभेत प्रमुख नेते काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. दरम्यान, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, गेली दहा वर्षे पालकमंत्री राम शिंदे हे येथून प्रतिनिधित्व करत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात राम शिंदेंच्या कामाचे कौतुक केले. तर, पुढील मंत्रिमंडळात ते पुन्हा मंत्री असतील याची ग्वाही देखील दिली.
दरम्यान, राम शिंदेना पुन्हा मंत्री करू या फडणवीस यांच्या वक्तव्याचा मार्मिक समाचार शिवस्वराज्य यात्रेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. मंत्री व्हायला राम शिंदे निवडून तर आले पाहिजेत, असा टोला लावत रोहित यांचे पारडे जड असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. लोकसभेला सुजय विखेंमुळे नगर जिल्हा राज्यात एक नंबरवर चर्चेत होता. त्याचप्रमाणे आता शरद पवारांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादी पक्षाकडून पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरल्याने हा मतदारसंघ आता पासूनच चर्चेत आहे. दरम्यान, कोणतीही कसर न सोडता दोन्ही बाजूने एकाच दिवशी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेत पदरी पडलेली मानहानी पवार कुटुंबीय पुसण्यात यशस्वी होणार का? हे विधानसभा निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.