अहमदनगर - महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश घुले यांनी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये असून भाजप विरोधात आहे. असले तरी अहमदनगर महानगरपालिकेत मात्र सुरुवातीपासून भाजपच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आली आहे. आता भाजपनेही या बदल्यात स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे.
भाजप महापौर अर्ज भरते वेळी आवर्जून उपस्थित -
भाजप नगरसेवक आणि महापौरांच्या हातात हात घालून राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश घुले यांनी आपला सभापतीपदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अगदी विरुद्ध जात भाजप आणि राष्ट्रवादीची मैत्री अहमदनगर महापालिकेत कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतील ही मैत्री, त्यांच्यातील समन्वय आणि महानगरपालिकेतील ताळमेळ हे सर्वज्ञात आहेच. राज्यात अजितदादा-फडणवीस फॉर्म्युला जरी फेल गेला असला तरी नगरमध्ये मात्र राष्ट्रवादी-भाजप मैत्रीपूर्ण आघाडीचा फॉर्म्युला जवळपास अडीचवर्षांपूर्वीच यशस्वी झालेला आहे. 2019च्या महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेल्या शिवसेनेला विरोध म्हणून, तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळालेल्या भाजपचे महापौर उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आणि पक्षविरोधी भूमिका घेत निवडून आणले. अहमदनगर महानगरपालिकेत स्थानिक राष्ट्रवादीच्या निर्णयामागे आमदार संग्राम जगताप होते. मात्र, तरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावेळी फक्त राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर कारवाई केली होती. नगरसेवकांवर पक्ष निलंबनाची केलेली कारवाई देखील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही दिवसातच मागे घेतली गेली. त्यानंतर नगरचा भाजप-राष्ट्रवादी पॅटर्न राज्यात चर्चेत आला.
स्थानिक शिवसेनेत अस्वस्थता, पक्षाध्यक्षांकडे तक्रार करणार -