शिर्डी (अहमदनगर) - राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र जनतेच्या पदरी काय पडलं तर फसवणूकच पडली असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. आज भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिर्डीत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
भाजपचा विश्वासघात करून शिवसेनेने तिसऱ्या आघाडीत जन्म घेऊन दोन वर्षे पूर्ण करून जनतेच्या पदरी ओबीसींचे राजकीय आरक्षण दाबले, मराठा समाजाचे आरक्षण गांभीर्याने घेतले नाही. अनुसूचित जाती व जमातीचे आयोगाची चालढकल करण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले, शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही आणि एस.टी. कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो आहे. अशा अनेक समस्या राज्यातील जनतेची फसवणूक करतच आघाडी सरकारच्या जन्म झाला असल्याचे टीकास्त्र भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये ओबीसींबाबत केंद्र सरकारकडे डाटा वेळेत पाठवला नव्हता. त्यामुळे यामध्ये १५ सुनावण्या होऊनही ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळालं नाही. दुसरीकडे महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिला असुरक्षित आहेत. सावित्रीच्या लेकी सुरक्षित नाहीत. अनुसूचित जाती व जमाती आयोगाची चालढकल करण्याचा प्रयत्न केला. या आयोगाची निधीची उपलब्धताच करून दिली नाही. राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात आहे. केवळ आपल्या फायद्याच्या संस्थेला कंत्राट देण्यासाठी २१ वेळा परीक्षा बदल केला.पुरात मराठवाडा व कोकण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. तर शिवसेना व राष्ट्रवादीने निवडणुकामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. आता त्यांच्यावर एसटीचे खासगीकरण करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या सरकारने त्यांच्याकडेही डोळेझाक केली. या सरकारच्या गृहखात्याच्या अमरावती व मालेगावमध्ये दंगली होतात आणि या खात्याला माहीत होत नाही. हे दुर्दैव आहे. एकूणच विरोधकांची दडपशाहीने मुस्कटदाबी करून फसवणूक करणारे सरकार असल्याचं टीकास्त्र केशव उपाध्ये यांनी सोडले आहे.
उपाध्ये यांची राजकीय फटकेबाजी -
- कृषी कायदे मागे घेतल्यावर तातडीने प्रतिक्रिया देणारे मुख्यमंत्री आज एस टी संपाबाबत बोलत नाही, त्याना दिलासा देत नाहीत.
- शरद पवार पावसात भिजले या वयात त्यांचे कौतुकच आहे. मात्र आज कर्मचारी पावसात भिजत बसले तरी सरकार बोलत नसेल तर या उद्वेगातून सदाभाऊ खोत यांनी टीका केली असावी.
- दोन वर्षात बार सुरू मंदिर बंद ही सरकारची मोठी अचिव्हमेंट.
- मंदिरातला प्रसाद बंद आणि स्कॉच वरील रेट कमी आहे, हे सरकार फसवणूक करणारे सरकार आहे.
- अनिल देशमुख यांच्या एक-एक सेकंदाचा हिशोब घेण्याची भाषा करणाऱ्या सरकारच्या दोन वर्षांचा एक-एक सेकंदचा हिशोब जनता आगामी काळात मांडल्याशिवाय राहणार नाही.
- या सरकारच्या विरोधात बोललं तर मंत्र्यांच्या बंगल्यात नेऊन मारलं जात.सोशल मीडियात विरोधात लिहिलं तर त्याचा डोळा फोडला जातो. दडपशाही आणि मनमानी करणं राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे. राज्यातले मंत्री जसे वागतात तसेच अधिकारी सुद्धा वागत आहेत. त्यामुळे पत्रकारांसह सर्वाना संघर्ष करावाच लागेल.