अहमदनगर -भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांना टोला लगावताना, महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते पाथर्डीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी राज्य सरकारमधील एक मंत्री उठसूट रोज टीव्हीवर येत आहेत. त्यांना शेतीचे उत्पन्न, शेतकरी शेतात जे पिके पिकवतो त्याच्या किंमती माहित नसतील पण गांजा, अफीम, ड्रगच्या किंमती माहीत आहेत. आमच्या शेतकऱ्याच्या घरात कांदा, गहू, सोयाबीन सापडेल, पण यांच्या घरात गांजा, ड्रॅग्ज सापडताहेत, अशी जोरदार टीका मालिकांचे नाव न घेता केली.
हेही वाचा -भारतीय जनता पार्टी के हर एक सवाल का जवाब एक नवाब है - भास्कर जाधव
'आठ-दहा नेत्यांना बोलण्यास बंदीसाठी याचिका'
नवाब मालिकांचे नाव न घेता खा. सुजय विखे यांनी हे नेते घरी जातात की नाही, अंघोळ करतात की नाही, रात्री ते त्याच खुर्चीतच झोपतात की काय असा प्रश्न पडतोय, असे म्हणत मालिकांची खिल्ली उडवली. त्यापुढे जात खा. विखेंनी, सध्या रोज तेच-ते चेहरे कधीही पाहा दिसताहेत, याला लोक वैतागून गेले आहेत. यांच्यामुळे घराघरात भांडणे लागत आहेत. हे टीव्हीवर थांबले नाहीत तर अशा आठ ते दहा नेत्यांना जनहितासाठी प्रसारमाध्यमांवर टीव्हीवर येऊ न दिले जाऊ नये, या मागणीची एक याचिका हायकोर्टात दाखल करणार असल्याचे विखेंनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुणाला खूश करण्यासाठी कारवाया करू नयेत -नवाब मलिक
'शेतकऱ्यांसठी अनुदानाचा बॉम्ब फोडा'
सध्या राज्यात एसटीचे आंदोलन चिघळले आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचे, रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र महाविकास आघाडीतील एक नेता सकाळी झोपेतून उठण्यापूर्वी टीव्हीवर हजर असतो. तो खूर्चीवरून उठत नाही. खूर्चीमध्ये झोपी जातो की काय असे वाटते. रात्री टीव्ही सुरू केला तरीही तो तेथेच बसून असतो. आता यावरून घरात भांडणे सुरू व्हायला लागली आहेत. बेछूट आरोपांचे फटाका बॉम्ब फोडण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी एखादा अनुदानाचा बॉम्ब फोडा, अशी अपेक्षा विखे यांनी मलिक यांचे नाव न घेता केली आहे.