अहमदनगर- 'ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी केवळ मुंबई पुरतेच निर्णय करुन, ग्रामीण महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून दिले. फक्त केंद्र सरकारकडून मदतीच्या अपेक्षा करायच्या, मग तुम्ही काय करणार? मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या निर्णयाचा कोणताही लाभ ग्रामीण महाराष्ट्राला होणार नाही', असा थेट आरोप भाजपाचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. मानवतेच्या दृष्टीकोनातून सरकारी यंत्रणेतील आधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना संकटात केलेल्या निरपेक्ष कामांमुळेच सामान्य माणसाला आधार वाटल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणाऱ्या सरकारी वैद्यकीय आधिकारी, खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार, आशा सेविका आणि नर्सिंग स्टाफचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने प्रातिनिधीक स्वरुपात हा कृतज्ञता कार्यक्रम संपन्न झाला. सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपाचे कार्यकर्ते कोरोना योध्यांना घरी जावून सन्मानित करणार आहेत.