अहमदनगर - 'आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांसाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरीही केंद्र सरकारने डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४,७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या जुन्याच भावाने रासायनिक खते उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे', अशी प्रतिक्रिया भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
'1200 रूपये भावानेच मिळणार डीएपी खताची गोणी'
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने रासायनिक खतांसाठी आणखी १४,७७५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी १४० टक्के वाढली आहे. आता शेतकऱ्यांना डीएपी खताची गोणी मागील वर्षीच्याच किंमती इतकीच म्हणजे १२०० रुपये भावाने उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. असे विखे पाटील म्हणाले.