शिर्डी- शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात रविवारी बराच वेळ राजकीय खलबते झाली. श्रीरामपूर येथील पंचायत समितीच्या इमारतीच्या उदघाटनाचे निमित्त दोघे एकाच व्यासपीठावर होते. या दोन नेत्यांत काय चर्चा झाली असेल या बद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाच आब्दुल सत्तारांनी मी राधाकृष्ण विखे पाटलांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. मात्र, या बाबत अंतीम निर्णय पक्षप्रमु़ख उद्धव ठाकरेच घेतील, असेही सत्तार म्हणाले आहे. आता विखे पाटील पुन्हा शिवसेनेत जातील का यावर राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत.
सत्तारांची आणि माझी जुनी मैत्री, राजकीय अर्थ काढू नका-
विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तार आणि विखे हे दोघेही काॅंग्रेसमध्ये होते. सत्तार आणि विखे पाटलांची चांगली मैत्रीही आहे. निवडणुकीनंतर दोघांनीही दोन वेगवेगळ्या पक्षात पक्षांतर केले होते. या दरम्यानही विखे आणि सत्तार यांच्या गाठी भेटी झाल्या होत्या. रविवारी ग्रामविकास खात्याच्या आयोजित कार्यक्रम असल्याने विखे यांनी मंत्री सत्तारांना आमंत्रण दिल होते. त्यांची आणि माझी जुनी मैत्री आहे. यातून काही वेगळा राजकीय अर्थ काढू नये, असे विखे पाटलांनी स्पष्ट केले आहे.