अहमदनगर -कोरोना संकटातून महाराष्ट्राला वाचविण्यात राज्य सरकार संपूर्णत: अपयशी ठरले असून सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन फक्त आधिकाऱ्यांच्या भरवश्यावर सुरू असून मंत्री फक्त मुंबईत बसले आहेत. आघाडी सरकार जनतेत नाही तर फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दिसत आहे, अशी टीका माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. लोणी बुद्रूक ग्रामपंचायत कार्यालयासमोर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. शिर्डी मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या अंगणात महाराष्ट्र बचाव आंदोलन करून आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा मास्क बांधून आणि काळे झेंडे दाखवून निषेध केला.
राज्यात कोरोना संकटाचे भीषण वास्तव अधिक वाढत आहे. या संकटातून राज्याला वाचविण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरल्यामुळेच राज्यात रुग्णांची संख्या 41 हजारांपर्यंत जाऊन पोहोचली असल्याकडे लक्ष वेधून, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी राज्य सरकारने जाणीवपूर्वक केली नाही. केंद्र सरकारच्या मदतीचा लाभही आघाडी सरकार जनतेपर्यंत पोहचवू शकले नाही. सरकारच्या या हलगर्जीपणामुळेच सर्वसामान्य नागरिक मृत्युच्या खाईत लोटला गेला असल्याचा आरोप विखे पाटलांनी केला.