अहमदनगर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे येत्या ३० जानेवारी पासून आपल्या कृषी मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत. अण्णांनी हे आंदोलन करू नये यासाठी भाजपाचे नेते प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने आज (गुरुवारी) सकाळीच माजी मंत्री आणि भाजप सरकार मधील संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी मध्ये अण्णांची भेट घेत केंद्र सरकारने नव्याने दिलेला प्रस्ताव अण्णांसमोर सादर केला.
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी अण्णा हजारे यांनी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या संदर्भात आज अण्णांसोबत झालेली चर्चा सकारात्मक झाली आहे. तसेच अण्णांनी मागणी केलेली उच्चाधिकार समिती गठीत होऊन तातडीने अण्णांनी केलेल्या मागणीवर तत्काळ निर्णय होणार आहे, त्यावरील नवीन प्रस्ताव उद्याच (शुक्रवारी) अण्णांना सादर केला जाईल. त्यामुळे आंदोलनाची वेळ अण्णांवर येणार नाही, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.