अहमदनगर -राज्याचे राजकारण काहीही असो पण, अहमदनगरचे राजकारण हे वेगळेच आहे. 2018साली झालेल्या महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडणून आले. पण, भाजपाचे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासह आपला महापौर पालिकेवर बसवला. आता स्थायी समिती सभापतीवेळीही नाट्यमय राजकारण पहायला मिळाले. भाजपाच्या नगरसेवकाने ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करत स्थायीचे सभापतीपद आपल्या पदरात पाडून घेतले. सभापतीपदासठी सेनेनेही अर्ज भरला होता. मात्र, थेट मातोश्रीवरुन फोन आला अन् आघाडी धर्म पाळण्यासाठी सेनेच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. यामुळे नवे सभापती नेमके भाजपाचे आहे की राष्ट्रवादीचे, याचा खुलासा शिवसेना मागत आहे.
अहमदनगर महापालिकेच्या 2018च्या पंचवार्षिकमध्ये सेनेचे सर्वाधिक नगरसेवक होते. मात्र, भाजपा व राष्ट्रवादीने सेनेला कात्रजचा घाट दाखवत भाजपाचा महापौर महापालिकेवर बसवला. यामुळे सेनेला धक्का बसला होता. राष्ट्रवादीने स्थायी समितीच्या सभापतीपदावर दावा केला. आघाडी धर्म पाळत व मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचे पालन करत शिवसेनेने स्थायीच्या सभापतीपदाचा अर्ज माघारी घेतला. मात्र, भाजपाचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला व सभापतीपद स्वतःकडे खेचले.