अहमदनगर - मुख्यमंत्री स्वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही भाविकांना वेठीस धरणार आहात, असा सवाल भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. महाविकास आघाडी सरकार आम्हाला रस्त्यावर येण्यास भाग पाडणार असेल तर, कोणतीही लढाई लढण्याची आमची तयारी आहे. मंदिरांसाठी आता यापुढेची आम्हाला न्यायालयीन लढाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने राज्यातील मंदिर सुरू करावीत म्हणून आंदोलनं करण्यात आली. अध्यात्मिक आघाडीच्या वतीने श्री क्षेत्र कोल्हार येथील भगवती माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या शंखनाद आंदोलनात विखे पाटील सहभागी झाले.
अन्यथा भावनांचा उद्रेक होईल
भाविक, वारकरी आणि अध्यात्म क्षेत्रातील व्यक्तिंच्या भावनांशी तुम्ही खेळू नका. यापूर्वी पंढरपूरच्या वारीवर बंधन घालून तुम्ही वारकऱ्यांचा अपमान केलेलाच आहे आता अधिक अंत पाहू नका अन्यथा या भावनांचा उद्रेक होईल, अशा शब्दात विखे पाटील यांनी सरकारला खडेबोल सुनावले.
मंदिरांबाबत उदासिनता का..?
राज्यात एकीकडे दारूची दुकाने सरकारने सुरू केली आहेत. लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तिंना तुम्ही मॉलमध्ये परवानगी दिली. मुंबईतील लोकलही सुरू केल्या. मग मंदिरांबाबतच येवढी उदासिनता का, असा सवाल आमदार विखे पाटील यांनी उपस्थित केला. या सरकारच्या विरोधात सर्वच समाज घटकांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत आहे. अध्यात्मिक क्षेत्रही आता बाजूला नाहीत. मंदिरांची दारे उघडावीत म्हणून दीड वर्षापासून सर्वांची मागणी आहे. पण, या बहिऱ्या, मुक्या, आंधळ्या महाविकास आघाडी सरकारला कोणत्याही भावना उरल्या नाहीत, अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
...अन्यथा तीव्र आंदोलन करू
आधिवेशन आले की, राज्यातील कोविड वाढतो, सण, उत्सव आले की, या सरकारला टाळेबंदीची आठवण होते. शाळा सुरू करण्यासाठीही सरकार तारीख पे तारीख जाहीर करते. हे सरकार संपूर्णपणे गोंधळलेले आहे. या सरकारने घेतलेले निर्णय शेवटपर्यंत टिकत नाहीत. मंदिरे बंद ठेवली मग मंत्र्यांचे दौरे थांबलेत का, मुख्यमंत्री स्वत: घरात बसले आणि देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्ही भाविकांना वेठीस धरणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मंदिर परिसरातील व्यवसायीकांना दिलासा देण्यासाठी आणि भाविकांच्या श्रध्देचा सन्मान करण्यासाठी मंदिरे सुरू करण्याचा निर्णय तातडीने घ्या, अन्यथा सरकारच्या विरोधात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार विखे पाटील यांनी दिला.
उद्धवा अजब तुझे सरकार भजन सादर
या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वच वारकरी सांप्रदायातील भजनी मंडळींनी उद्धवा अजब तुझे सरकार हे भजन सादर करुन, वारकरी, व्यवसायीक यांच्यापुढे निर्माण झालेल्या व्यथा भजनाच्या माध्यमातून मांडल्या. सर्वच कार्यकर्त्यांनी या भजनावर ठेका धरुन या आंदोलनातील उत्साह व्दिगुणीत केला.
हेही वाचा -सगळ्याच बाबतीत कमिशन खाणाऱ्या सरकारला, मंदिरातही कमिशन पाहिजे का? - राधाकृष्ण विखे पाटील