अहमदनगर - जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यासाठी वरदान ठरलेले भंडारदरा धरण आज १०० टक्के भरले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने 11 टीएमसी साठवण क्षमता असलेले हे धरण आज सकाळी पूर्णपणे भरले. सकाळी सहा वाजताच प्रवरा नदी पात्रात ३ हजार २६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
भंडारदरा धरण १०० टक्के भरले रात्री धरणात १० हजार ३३६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा (९३.६३ टक्के) तयार झाला होता. त्यामुळे सकाळपर्यंत धरण पूर्णपणे भरेल, अशी शक्यता होती. त्याप्रमाणे आज सकाळीच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला गेला. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो.
दरवर्षी १५ ऑगस्ट पूर्वी किंवा त्यादिवशी धरण 100 टक्के भरते. ही परंपरा यावर्षीही मोडते की काय अशी शक्यता या महिन्याच्या सुरुवातीला होती. मात्र, गेल्या पाच दिवसापासून सातत्यपूर्ण पावसाला सुरुवात झाल्याने यावर्षीही धरण ऑगस्टच्या मध्यात भरले.
भंडारदऱ्या पाठोपाठ त्याच्या पायथ्याशी असणारे ८.५ टीएमसी क्षमतेचे 'निळवंडे धरण'ही येत्या काही दिवसात पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही धरणाचा मिळून २० टीएमसी पाणीसाठा अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, श्रीरामपूर, नेवासे या सहा तालुक्यांसाठी उपलब्ध होईल. शेतीला, साखर कारखान्यांना व उद्योगांना वर्षभर मुबलक पाणी मिळेल. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.