शिर्डी (अहमदनगर)- मार्च महिना, रणरणते ऊन या उन्हात चिमण्यांना पाणी व अन्नाची गरज असते. हे ओळखून पोनाडीच्या बालपण शाळेच्या 200 विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी मोकळी पाणी बाटली, खराब पुठ्ठे, खराब प्लास्टिक या टाकाऊ वस्तूंपासून पाणी व अन्न ठेवता येईल असे टिकावू बर्ड फिडर बनवत आहेत. पर्यावरण संवर्धन ही आमचीही जबाबदारी आहे, या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.
बालपण या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात उभारलेल्या सह्याद्री देवराईच्या केशरबागेत व शाळेच्या आवारातील सर्व झाडांना पाणी व अन्नधान्याचे बर्ड फिडर बसवून घरून धान्य व आपल्याकडील बाटलीत उरलेले पाणी या चिमण्यांसाठी देत त्याचे संवर्धन करण्याचे काम करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थी शाळेत सर्व पर्यावरण पूरक उपक्रम राबवत आहेत. पर्यावरण रक्षण ही प्रत्येक नागरीकाची जबाबदारी आहे. यात बालपणाचे विद्यार्थी हे आवाहन स्वीकारत एक प्रकारे खारीचा वाटा उचलत आहे. या उपक्रमासाठी बालपणच्या प्रमुख सोनाली मुंढे यांसह सर्व महिला शिक्षकांनी या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.