अहमदनगर - कालपर्यंत पक्षात येणाऱ्यांचा आमच्याशी संपर्क नव्हता मात्र, आज सकाळपासून अनेकांचे फोन येत असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. ही जागा जाहीर करु नका ती जागा जाहीर करु नका, अशी मागणी केली जातेय. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेस पक्ष निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आमच्या उमदेवारांची जवळपास नावे तयार झालेली आहेत. गेल्या ५ वर्षात काँग्रेसचे काम राज्यात सुरु होते. आम्हीही दोनदा यात्रा काढल्या आहेत. अनेक प्रश्नांवरुन आंदोलन केली आहे. या सरकारकडे एक अपयशी सरकार म्हणून बघीतले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न तसाच आहे. जनतेत नाराजीचा सुर आहे. त्यामुळे जनता आमच्या बरोबर राहील असेही थोरात यावेळी म्हणाले.