महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्‍मचरित्राचे पंतप्रधान मोदी १३ ऑक्टोबरला करणार प्रकाशन - Pravara Gramin Shikshan Sanstha news

अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्येष्‍ठ नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी १९६२ पासूनच्‍या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा ऐतिहासिक असा दस्‍ताऐवज 'देह वेचावा कारणी' या आत्‍मचरित्रात मांडला आहे. या आत्मचरित्रात राज्‍याच्‍या आणि देशाच्‍या सर्वच राजकीय स्थित्‍यंतराचा आढावा घेण्यात आला आहे.

माजी राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
माजी राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

By

Published : Oct 8, 2020, 1:01 PM IST

अहमदनगर- पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्‍दबद्ध केलेल्‍या 'देह वेचावा कारणी' या आत्‍मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ ऑक्‍टोबरला व्‍हर्च्‍युअल रॅलीच्या माध्यमातून होणार आहे. याच कार्यक्रमात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचा नामविस्‍तार होणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शेती, शिक्षण, सहकार आणि पाणी प्रश्‍नासंदर्भात संपूर्ण देशाला आदर्शवत ठरेल, असे कार्य केले आहे. त्यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन प्रवरानगर येथे डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे माजी राज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्‍यासह खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले.

'देह वेचावा कारणी' आत्मचरित्र

काय आहे आत्मचरित्रात?
अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्येष्‍ठ नेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी १९६२ पासूनच्‍या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा ऐतिहासिक असा दस्‍ताऐवज 'देह वेचावा कारणी' या आत्‍मचरित्रात मांडला आहे. या आत्मचरित्रात राज्‍याच्‍या आणि देशाच्‍या सर्वच राजकीय स्थित्‍यंतराचा आढावा घेण्यात आला आहे. वेळोवेळी घ्‍याव्‍या लागलेल्‍या राजकीय भूमिका डॉ.बाळासाहेब यांनी आत्मचरित्रात परखडपणे मांडल्या आहेत. राज्‍यासह देशाच्‍या शेती, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाच्‍या संदर्भात तत्‍कालीन राज्‍यकर्त्‍यांच्‍या चुकलेल्‍या धोरणांवरही बाळासाहेब विखे पाटील यांनी मत व्यक्त केले आहे. या आत्‍म‍चरित्राची उत्‍सुकता सर्वांनाच असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले.

एप्रिलमध्ये होणार होता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम-
पुढे विखे पाटील म्हणाले, की या आत्‍मचरित्राचे प्रकाशन त्‍यांच्‍या हयातीतच व्‍हावे, अशी आमच्‍या कुटुंबीयांची इच्‍छा होती. परंतु, त्‍यांच्‍या तब्‍येतीच्‍या कारणाने ते शक्‍य झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आत्‍मचरित्राचे प्रकाशन लोणी येथे येऊन करावे यासाठी केलेली विनंती मान्‍यही केली होती. मात्र कोरोनाच्या संकटाने हा एप्रिल २०२० मधील नियोजित कार्यक्रम होऊ शकला नाही. पंतप्रधानाच्‍या हस्‍तेच १३ ऑक्‍टोबरला व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून हा कार्यक्रम होत असल्याचा आनंद आहे.

चौदाही तालुक्यात स्क्रीन आणि प्रोजेक्टरची व्यवस्था

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण शिक्षणाचा विस्‍तार करतान कौशल्‍य विकासाला दिलेले प्राधान्‍य महत्‍वपूर्ण आहे. या माध्‍यमातूनच संस्‍थेतील दीड लाख विद्यार्थी विविध देशांमध्‍ये वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्‍वीरित्‍या कार्यरत आहेत. हा त्‍यांचा दुरदृष्टीचाच भाग होता. त्‍यामुळेच त्‍यांच्‍या शैक्षणिक कार्याची कृतज्ञता व्यक्‍त करण्‍यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचा नामविस्‍तार करण्‍याचा निर्णय विश्‍वस्‍त मंडळाने घेतल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांशी व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून संवाद साधणार आहेत. जिल्‍ह्यात ही व्‍हर्च्‍युअल रॅली सर्वांना पाहता यावा, यासाठी चौदाही तालुक्‍यात स्‍क्रीन आणि प्रोजेक्‍टरची व्‍यवस्‍था करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details