अहमदनगर -संगमनेर येथील जयहिंद लोकचळवळ ( Jayhind Lokchalval ) व महाराष्ट्र शासनाच्या कृषी ( Maharashtra Agriculture Department ) विभागाच्यावतीने पात्र शेतकऱ्यांना सात ट्रॅक्टर व चार गवत काढणे यंत्रांचे वितरण करण्यात आले असून कृषी व्यवसायाला यांत्रिकीकरणाची जोड दिली, तर हा व्यवसाय नक्कीच लाभदायी ठरतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी यावेळी बोलताना दिली.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात -
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व जयहिंद लोकचळवळीच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी शेती साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील सात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व चार गवत काढणी यंत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीमध्ये आधुनिकता आणणे गरजेचे आहे. व्यापारी पद्धतीने शेती केल्यास ती फायदेशीर ठरू शकते. याचबरोबर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केला पाहिजे. त्यामुळे कमी कष्टात व कमी वेळेत जास्त उत्पादन घेता येईल. शेती व्यवसायात महिला भगिनींचा ही सातत्याने मोठा वाटा राहिला आहे. त्यांनाही आधुनिक प्रणालींची माहिती झाल्यास नक्कीच या व्यवसायाला व त्या कुटुंबाला फायदा होईल. शेती संशोधनात मोठा वाव असून तरुणांनी आधुनिक शेती बरोबर उद्योग व्यवसायाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.