अहमदनगर: कर्नाटक मधील विजय हा मोठा असून तो जनतेचा विजय आहे. भाजपने सुरू केलेले दहशतीचे आणि जातीभेदाचे राजकारण हे भारतीय नागरिकांना मान्य नसून, कर्नाटक विधानसभा निकालाने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात व राज्यात काँग्रेसच्या सरकारची गरज आहे. भाजपाची आता घसरण सुरू झाली असल्याचे प्रतिपादन, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
कार्यकर्त्यांनी केला जल्लोष: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात साजरा केला. यावेळी समवेत आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक,निखिल पापडेजा, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, जयराम ढेरंगे, किशोर टोकसे, अर्चनाताई बाकोडे आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीवर विश्वास असणारा काँग्रेस पक्ष: या विजयानंतर बोलताना काँग्रेस नेते थोरात म्हणाले की, काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासाचा व लोकशाहीवर विश्वास असणारा पक्ष आहे. 2014 मध्ये भुलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेले असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहे. भाजपाची कार्यपद्धती ही दहशतीची आणि द्वेषाची असून समाजात तेढ निर्माण करत आहे. यामुळे भारतातील नागरिक बंधू-भगिनी हे अस्वस्थ आहेत.