शिर्डी(अ्हमदनगर) - धूळवड वर्षातून दोन दिवसांची असते, त्यानंतर ती नसली पाहिजे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यातील राजकीय धूळवड दुर्दैवी असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केले आहे. व्यक्ती द्वेष आणि व्यक्तिगत आरोपांची धूळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. त्यामुळे ही राजकीय धूळवड योग्य नाही, असे थोरात म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आरशासमोर उभे राहावे म्हणजे त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल, असा खोचक टोलाही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात थोरातांनी फडणवीसांना काढला चिमटा -
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आहे की आम्ही 2024 ला पुन्हा येणार. फडणवीस यांनी आरसासमोर उभे राहावे, त्यांना पुन्हा पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना लगावला.
माझ्या राजकीय जीवनामध्ये जोर्वे गावाचा मोठा वाटा - बाळासाहेब थोरात
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराची सुरुवात जोर्वेच्या सोसायटीपासून केली. तालुक्यातील सहकाराची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने जोर्वे येथून रोवली गेली. जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँकेतही त्यांनी प्रतिनिधित्व केले हे या सेवा सोसायटींसाठी अत्यंत अभिमानाचे आहे. दादांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांवर जोर्वे येथील सर्व संस्थांचा व संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचा अत्यंत काटकसरीने व पारदर्शकपणे कारभार सुरू आहे. ही परंपरा कायम जपत आपण जनतेच्या सहकार्याने राज्यात लौकिक निर्माण केला आहे. दादांच्या सहकारातील जीवनात व आपल्याही राजकीय जीवनामध्ये जोर्वे गावासह येथील गोरगरीब नागरिकांचा मोठा वाटा राहिला आहे. यापुढेही सर्वांनी विकासाच्या पाठीमागे भक्कम उभे राहावे. काही मंडळी विष कालवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तीपासून दूर राहावे, असे आवाहन थोरात यांनी केले.