अहमदनगर :संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रास्ता रोको हा शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी आहे. मात्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वसामान्य जनतेला त्रास नको म्हणून आमदार बाळासाहेब थोरात यांनी रास्ता रोको करण्या ऐवजी धरणे आंदोलन करून आपली भूमिका मांडावी अशी सूचना कार्यकर्त्यांना केल्या. लोकांना वेठीस न धरता लोकशाही व न्याय पद्धतीने आपल्या मागण्या मांडण्याची ही पद्धत नक्कीच राज्यासाठी अनुकरणीय ठरणार आहे, असे ते म्हणाले.
पिकांचे भाव पडले :भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.