अहमदनगर - विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेली रस्सीखेच, हे निव्वळ नाटक असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पाच वर्षे एकमेकांवर टीका करणारे लोकसभेला गळाभेट घेताना आपण पाहिलंय, त्यामुळे आगामी मुख्यमंत्री जनता ठरवेल असं ते म्हणाले.
थोरातांनी आदित्य ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रेवरही टिका केली आहे. आदित्य तरुण आहे, कॉलेज जीवनाचा आनंद घेण्याच्या काळात तो राजकारणात आला आहे. खर तर त्याने निवडणुकीची वेळ नसताना महाराष्ट्रात फिरून शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. निवडणुकीसाठी महाराष्ट्रात फिरण्यात काही वावगं नाही, असं ते म्हणाले. मात्र, महाराष्ट्रातील हिवरेबाजार, राळेगणसिद्धी यांसारख्या आदर्श गावांत त्याने चार दिवस रहावे, असा सल्ला थोरातांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.