अहमदनगर -यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार बाळ बोठेला आता तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोठे याची सलग तिसऱ्या गुन्ह्यात आता पोलीस चौकशी करत आहेत.
कोतवालीनंतर तोफखाना पोलिसांनी बोठेला घेतले ताब्यात
रेखा जरे हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेला बाळ बोठे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर, कोतवाली पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यात चौकशीसाठी त्याला वर्ग करून घेतले होते. तिथे त्याची पोलीस कोठडी संपल्याने तोफखाना पोलिसांनी पारनेर न्यायालय व जिल्हा न्यायालयात अर्ज करून, बाळ बोठे याची खंडणीच्या गुन्ह्यात चौकशी करायची असल्याने त्याला वर्ग करून घेण्यासाठी अर्ज दिला होता. रविवारी पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.