अहमदनगर : यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे आता आणखी एका प्रकरणात अडकला आहे. त्याला गुरुवारी पारनेर न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग केले. यानंतर न्यायालयाबाहेर हजर असलेल्या कोतवाली पोलिसांनी बोठेला तात्काळ ताब्यात घेतले.
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल -
रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार होता. त्या दरम्यान, त्याच्या विरोधात नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानुसार, बाळ बोठेवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -Live Updates : गल्ली ते दिल्ली आज बंद; शेतकऱ्यांचे आवाहन; रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
बाळ बोठेला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग -
बोठे याला अटक झाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर यांनी आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी पारनेर न्यायालयात अर्ज केला होता. त्यानुसार, गुरूवारी दुपारी आरोपी ताब्यात घेण्यासाठी कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा पारनेर न्यायालयाबाहेर हजर होता.
बोठेला आज करणार जिल्हा न्यायालयात हजर -
बोठेला नगर जिल्हा न्यायालयात आज (26 मार्च) हजर करणार असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी दिली आहे. बोठेची आता विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणीही चौकशी होणार आहे.
हेही वाचा -'लवकरच सत्य बाहेर येईल व आरोप करणारे तोंडघशी पडतील'
अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला बाळ बोठे -
रेखा जरे यांच्या हत्येच्या घटनेनंतर मुख्य आरोपी बाळ बोठे तीन महिन्यांपासून फरार होता. पण, पोलिसांच्या शोध मोहिमेला यश आले आणि त्याला 13 मार्च रोजी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली. यानंतर पारनेर न्यायालयात हजर केले. पारनेर न्यायालयाने त्याला प्रथम सात, त्यानंतर तीन आणि नंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपत असल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा गुरुवारी पारनेर न्यायालयासमोर हजर केले. यावेळी प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांनी बोठेला न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच, त्याला आता विनयभंगाच्या गुन्ह्यातही वर्ग केले आहे.