अहमदनगर - जिल्ह्यामध्ये अनलॉक होऊन काही दिवस झाले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार दुकाने ही नियमित वेळेत सुरु ठेवायची आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर दुकाने कधी सुरु ठेवण्याची व कधी नाही, याचा निर्यण घेतला जात असल्याने येथील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. आम्ही पाच वाजेपर्यंतच दुकाने बंद करावीत याची सक्ती केलेली नाही, असे मत प्रशासनाचे आहे. मात्र, दुसरीकडे पोलीस आणि नगरपालिका सक्ती करत असल्याचा आरोप राहाता येथील व्यापारी वर्गाने केला आहे.
दुकाने बंदच्या आदेशाला जनता कर्फ्यूचे रुप देण्याचा प्रयत्न, उपनगराध्यक्षांचा आरोप 'जनता कर्फ्यूचे रुप देण्याचा प्रयत्न'
जिल्हाधिकाऱ्यांचे कोणतेही आदेश नसताना, नगरपालिकेने व्यापाऱ्यांना तोंडी सुचना देत दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत बंद करण्याची तंबी दिली आहे. या निर्णयास उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी विरोध करत, शासनाची दुकाने बंद करण्याची वेळ काय आहे, असे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना विचारले. मात्र, मुख्याधिकारी ठोस उत्तर देत नसल्याने, पठारे यांनी मुख्याधिकाऱ्यांचे पाय धरत सरकारी आदेश दाखवण्याची विनंती केली. दरम्यान, भाजपच्या नगराध्यक्ष ममता पिपाडा यांचे पती राजेंद्र पिपाडा यांनी ठराविक व्यापाऱ्यांची नगरपालिकेत बैठक घेत, चार वाजेपर्यंत दुकाने बंद करण्याच्या आदेशाला जनता कर्फ्यूचे रुप देण्याचा प्रयत्न केलाय, असा आरोप पठारे यांनी केला आहे.
'राहाता शहरात गुरुवारी जनता कर्फ्यू'
राहाता शहरात गुरुवारी जनता कर्फ्यू अंतर्गत दुकाने पूर्णबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहाता शहरासह नगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असताना, केवळ श्रेय वादावरून राहात्यात दुकाने बंदचे राजकारण केले जात असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.