अहमदनगर - अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नोटीसीवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते. त्यावरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राऊत यांना टोला लगावला आहे. काही चुकीचे केले नसेल तर घाबरता कशाला, आमच्या कुणी नादी लागले तर आम्ही पण नादी लागतो, पण आम्हाला कुणाच्या नादाला लागायचे नाही, मात्र ईडी तुमच्या नादाला लागली आहे, अशी कोपरखळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावली आहे.
ईडीला चोख उत्तर द्या
ईडीच्या नोटीसीवरून खासदार राऊत यांनी भाजपने आमच्या नादाला लागू नये असे आव्हान दिले होते. या आव्हानाला उत्तर देताना आठवले यांनी अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांना टोला लगावला. आठवले हे सोमवारी नगर जिल्हा दौऱ्यावर होते त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. आठवले म्हणाले, संजय राऊत माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी जर काही चुकीचे केले नसेल तर घाबरू नये. ईडीला चोख उत्तर द्या, असेही ते सांगायला विसरले नाहीत. मात्र आता ते आमच्या सोबत नाहीत, आम्ही नव्हे तर ईडी त्यांच्या मागे लागली आहे, असे आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसने स्वाभिमान ठेवून सरकार मधून बाहेर पडावे
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सामील असला तरी त्यांचा सातत्याने अपमान होत आहे. खासदार संजय राऊत देखील सामनाच्या माध्यमातून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका-टिप्पणी करतात. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या सरकारमधून बाहेर पडून ठाकरे सरकार पाडावे असे आवाहन आठवले यांनी केले. हे सरकार मात्र आम्ही (भाजप) पाडणार नाही, मात्र सरकार पडले तर आम्ही सरकार बनवू, कारण पुन्हा निवडणुका घेणे कुणाला आवडणार नाही असेही आठवलेंनी सांगितले.
हेही वाचा-'बॉक्सिंग डे' कसोटीत भारताचा डंका, ८ गडी राखून नोंदवला विजय