अहमदनगर -नगर शहरामध्ये रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे महापालिकेच्या आवारात काँग्रेसच्यावतीने आसूड मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलक आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात चांगलीच हमरातुमरी झाली. मनपा आयुक्त हे स्वतः निवेदन घेण्यास न येता उपायुक्तांनी निवेदन स्वीकारल्याने किरण काळे चांगलेच भडकले, आयुक्तांच्या दालनात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना जाऊ न दिल्याने पोलिसांसोबत त्यांनी मोठी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करत बाहेर आणले. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दमदाटी, अरेरावी करण्याचा प्रकार शहर काँग्रेसच्या मोर्चात मंगळवारी घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आसूड मोर्चाकाढून काँग्रेसने मनपा सोडली दणाणून -
नगर शहरात रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे, त्याचबरोबर डीपी रस्त्यांच्या कामांचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने मनपावर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आसूड मोर्चा काढत मनपाला जाब विचारण्यात आला. यावेळी काँग्रेस आंदोलकांनी महानगरपालिकेच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोतराजांसह किरण काळे यांनी मनपावर आसूड उगारत मोर्चाचे नेतृत्व केले. टॉप अप पेट्रोल पंपापासून सुरू झालेला मोर्चा महानगरपालिकेवर धडकला. त्यावेळी महानगरपालिकेचा आवार कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आंदोलकांच्या गर्दीने फुलून गेले होते. आंदोलकांच्या हातांमध्ये महानगरपालिकेच्या निषेधाचे फलक झळकत होते. काँग्रेसचे झेंडे देखील फडकत होते.
मोर्चाच्या आडून सेना-राष्ट्रवादीवर काँग्रेस बरसली -
गेल्याच आठवड्यात महानगरपालिकेवर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे. राज्यात तीन पक्षाची महाविकास आघाडी असताना अहमदनगर मनपात मात्र सेना-राष्ट्रवादीने काँग्रेसला खड्यासारखे बाजूला ठेवले. काँग्रेसचे ज्येष्ठनेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात हे महापौर पद काँग्रेसला मिळावे म्हणून आग्रही होते. मात्र त्यांनाही विचारात घेतले नसल्याने काँग्रेस शहरात सेना-राष्ट्रवादीच्या विरोधात आता दंड थोपटून उभी ठाकली आहे.