अहमदनगर - राहाता तालुक्यातील अस्तगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने गाव 5 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार दि. 17 ते बुधवार दि. 21 पर्यंत गाव लॉकडाऊन राहाणार आहे. कोरोना ग्रामसुरक्षा समितीने हा निर्णय घेतला आहे. 15 दिवसात दोघांचे करोनाने निधन झाले, तर 15 रुग्ण अॅक्टिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.
हा लॉकडाउन शुक्रवारी रात्री 8पासुन सुरू झाला आहे. लॉकडाउन गुरुवारी सकाळी 7पर्यंत सुरु राहील. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, दवाखाना व वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दुग्ध उत्पादक व दूध संकलन केंद्र यांना सकाळी 7 ते 8 व संध्याकाळी 6 ते 8 यावेळेत दूध संकलन करता येईल. या कालावधीत कोणीही बाहेर फिरु नये, घराबाहेर पडू नये, विनाकारण रत्यावर व इतरत्र फिरु नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनामास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आजूबाजूचे बहुतांशी गावे लॉकडाऊन करण्यात आली होती. अस्तगाव मात्र वीक-एन्ड लॉकडाऊन लॉकडऊन होते. मात्र, रुग्णांची वाढती संख्या आणि दुकानदार पॉझिटिव्ह आल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रवींद्र गोर्डे यांच्या सूचनेवर करोना ग्रामसुरक्षा समितीने पाच दिवस संपूर्ण गाव लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच तथा समितीचे अध्यक्ष नवनाथ नळे यांनी दिली.
यावेळी समितीचे सदस्य डॉ. रवींद्र गोर्डे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर, कामगार तलाठी पद्मा वाडेकर, पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, चोळकेवाडीचे पोलीस पाटील प्रदीप चोळके, मोरवाडीच्या पोलीस पाटील निता मोरे, तरकसवाडीचे विलासराव तरकसे आदी उपस्थित होते.
अस्तगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्तगाव, पिंप्रीनिर्मळ, राजुरी, ममदापूर, रांजणगाव खुर्द, एकरुखे ही पाच गावे आहेत. आतापर्यंत या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 1502 रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यात 104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या पाच गावातुन आढळले असून 14 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या पाच गावातील 46 अँटिजेन टेस्ट पैकी 6 पॉझिटिव्ह आल्या आहेत.