जगण्याची कैफियत मांडताना कारागीर अहमदनगर: शहरातील नगर-मनमाड महामार्गालगत मोकळ्या जागेत पाटा-वरवंटे बनविणारे एक कुटुंब थेट औरंगाबाद जिल्ह्यातून आले आहेत. या कुटुंबातील गोरख धोत्रे, पूजा धोत्रे व लहान मुले त्यांच्या संघर्षाची ही कथा. यांत्रिकीकरणाच्या युगात 'जुनं ते सोनं' याची किंमत माणसांना कळायला लागली. म्हणून पुन्हा जुन्या गोष्टींना महत्त्व येऊ लागले.
कारागिरांनी बनविलेले वरवंटे
पाटा-वरवंट्याची पुन्हा क्रेज:मिक्सरचा मसाला रुचकर लागत नाही. म्हणून स्वयंपाक घरात पाटा-वरवंट्याची पुन्हा क्रेज आली. अनेक नव्या नववधूंना माहेरी कधी पाटा-वरवंटा नसल्याने पाट्यावर मसाला वाटणे माहिती नाही; परंतु तरीही सासरी आल्यावर प्रत्येक गृहिणीला तिच्या किचनमध्ये पाटा-वरवंटा हवा. त्यामुळे गेल्या काही दिवसात पाटा-वरवंटा, जाते या दगडी वस्तुंची मागणी अचानक वाढली आहे. त्यामुळे या वस्तु बनविणारे कारागीर ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता दगडाला आकार देतात.
मुलंही देतात पाषाणाला आकार:दगडापासून वस्तू बनविणेहा या कारागिरांचा पारंपरिक व्यवसाय. परंतु, यांत्रिकीकरणाच्या युगात तो मागे पडला होता. आता थोडीफार मागणी वाढल्याने धोत्रे कुटुंबीय मजल दरमजल करत एका गावातून दुसऱ्या गावात जातात. असेच एक महिन्यांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात धोत्रे कुटुंबीय राहायला आले. दोन वेळच्या भाकरीसाठी भल्या सकाळपासून पती-पत्नी, भाऊ इतकेच काय चिमुकले मुलंही हाती छन्नी-हातोडा घेऊन काळ्या पाषाणाला आकार देऊ लागतात.
'त्या' कारागिरांच्या मुलांचे काय?पाटा, वरवंटे, देव या वस्तुंच्या विक्रीतून त्यांना कष्टाचे दाम मिळते. यातून दोन वेळचे ताटात येत असले. तरी भावी पिढ्यांचे काय? या कारागिरांची मुले शिकली नाही तर त्यांच्या आयुष्याला आकार कसा येणार? हा प्रश्न कायम आहे. जगण्याच्या संघर्षासमोर ना या कुटुंबाला वेळ आहे आणि ना तर या देशातील प्रशासन व्यवस्थेला. मग महात्मा गांधीपासून ते संत गाडगेबाबापर्यंतच्या तसेच इतर संतांच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात साकारेल कसा? असा प्रश्न निर्माण होतो.
हेही वाचा:
- Pandharpur Palkhi Sohala : यंदा पालखी सोहळ्यात दर तीन किमीला निवारा केंद्र; महिलांसाठी हिरकणी केंद्र
- Nitesh Rane on Love Jihad : पावसाळी अधिवेशनात 'लव्ह जिहाद'विरोधात कडक कायदा येणार - नितेश राणे
- Bajaj Finserv project : बजाज फिनसर्व्हची पुण्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक, राज्यात निर्माण होणार 40 हजार रोजगार-उपमुख्यमंत्री