अहमदनगर- जिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यांना भेटायला येत असलेल्या नातेवाईकांना बंदी घातली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी सोमवारी संध्याकाळी एकच गोंधळ घातला आहे. आम्हाला आमच्या नातेवाईकांना भेटून जेवण-पाणी द्यायचे आहे, त्यांच्या तब्येतीची माहिती हवी आहे. असे सांगणाऱ्या नातेवाईकांच्या बाजूने काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उभे राहील्याने जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांचा आक्रमक पवित्रा
सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि नातेवाईकांचा आक्रमक आग्रह पाहता, जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीही कठोर भूमिका घेत काही वेळ काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान या कार्यक्षेत्रातील तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र सामाजिक कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नातेवाईकांना रुग्णांना भेटू द्या, तो त्यांचा अधिकार आहे, असे सांगितले जात होते. उपस्थित पोलिसांनी साथरोग आणि त्याचे दुष्परिणाम आणि केंद्र-राज्य सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार सांगितलेले नियम नातेवाईक आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. शेवटी पोलिसांनी आपली भूमिका घेत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर कामबंद पुकारलेले जिल्हा रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरु केले.