अहमदनगर -देशभर प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी ८४ ग्रामस्थांनी अर्ज केले आहेत. यात ११ महिलांचा सहभाग आहे. नव्या वर्षापासून ११ नवीन विश्वस्त देवस्थानचा कारभार पाहणार असून अर्ज केलेल्यांपैकी कोणाची निवड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवस्थानवर गडाखांचे वर्चस्व -
शनी शिंगणापूर देवस्थानच्या शासकीय विश्वस्थपदांसाठी ११ महिलांसह ८४ जणांचे अर्ज.. - शनिशिंगणापूर देवस्थान समिती
देशभर प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यातील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी ८४ ग्रामस्थांनी अर्ज केले आहेत. यात ११ महिलांचा सहभाग आहे.
देवस्थानावर सुरुवातीपासून मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व असून अर्ज केलेल्यांपैकी बहुतेक त्यांचे समर्थक आहेत. नेवासा-सोनई परिसरात गडाखांचे पूर्ण वर्चस्व नेहमीच राहिले आहे. अपवाद वगळता यापूर्वी त्यांच्या मर्जीतील व्यक्तीच देवस्थानचे पदाधिकारी राहिले आहेत. फडणवीस सरकारने जून २०१८ मध्ये शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून ट्रस्टचे काम शासनाच्या नियंत्रणात आणून गावातीलच विश्वस्त असण्याची घटना रद्द करून नवीन विधेयक मंजूर केले होते.
जिल्ह्यात शिर्डी आणि शिंगणापूर प्रसिद्ध देवस्थाने-
जिल्ह्यात शिर्डी साईबाबा संस्थाननंतर शनी शिंगणापूर देवस्थान हे राज्यशासनाच्या अखत्यारित येणार आहे. मुंबईचे श्री सिद्धिविनायक देवस्थानही राज्य शासनाच्या अखत्यारीत असून शासनाच्या नियमावलीनुसार ही देवस्थाने कामकाज पाहतात. शिर्डी संस्थानवर आयएएस दर्जाचा अधिकारी कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याची तरतूद आहे. तर विश्वस्थ हे राज्यभरातील साईभक्त असतात. शिर्डी संस्थानचे विश्वस्थ मंडळ हायकोर्टाच्या आदेशाने बरखास्त असून तेथील नेमणुका प्रलंबित आहेत. नगर जिल्ह्यातील ही दोन्ही देवस्थाने देश पातळीवर प्रसिद्ध असल्याने या विश्वस्थ मंडळात अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि विश्वस्थ म्हणून वर्णी लागावी म्हणून मोठी चढाओढ असते. त्या दृष्टीने आता शिर्डीबाबत अजून निर्णय प्रलंबित असला तरी शनी शिंगणापूर देवस्थानावर नव्या वर्षात नवीन शासकीय अखत्यारीतील विश्वस्थ मंडळ कार्यरत होणार असल्याने या मंडळात कोणा-कोणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या २०२१ ते २०२५ च्या पंचवार्षिक विश्वस्त निवडीचा कार्यक्रम नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी जाहीर केला आहे.