अहमदनगर - कोरोना विषाणूची बाधा झालेला दुसरा रुग्ण बूथ हॉस्पिटल येथून बरा होऊन आज (शनिवारी) त्याच्या घरी गेला. यावेळी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्याला निरोप दिला. कोरोना विषाणूची बाधा झालेला दुसरा रुग्ण बरा झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या यशाचे कौतुक केले आहे.
नेवासे तालुक्यातील असलेल्या या रुग्णाच्या स्रावाचा अंतिम नमुना तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात होता. सलग दोनही अहवाल 'निगेटिव्ह' आल्यानंतर त्या रूग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे पहिल्या रुग्णानंतर दुसऱ्या रुग्णालाही 'डिस्चार्ज' मिळाला आहे. कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी परमेश्वर आम्हाला नक्कीच बळ देईल, अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हा रुग्णालयाचे डॉ. वैजनाथ गुरवले यांनी व्यक्त केली.