अहमदनगर -दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत. केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोग, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात, आदी मागण्या त्यांनी केल्या.
सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांनी भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे आणि सरकारला जागे करावे, असे आवाहन त्यांनी केले.
हा देश शेतकऱ्यांचा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकल्याच पाहिजे. शांततापूर्ण वातावरणामध्ये हे आंदोलन शेतकऱ्यांनी एकजुटीने यशस्वी केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंसा या आंदोलनात करू नये. कारण, हिंसा झाली तर सरकारला ते आंदोलन मोडीत काढता येतं, असे ते म्हणाले.