महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारला दहशत वाटेल असे आंदोलन दिल्लीत छेडणार; अण्णांचा इशारा - अण्णा हजारे बातमी

'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अण्णांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. तसेच येत्या महिनाभरात दिल्लीत आंदोलनाला बसणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.

अण्णा हजारे
अण्णा हजारे

By

Published : Dec 23, 2020, 7:38 PM IST

Updated : Dec 23, 2020, 8:10 PM IST

अहमदनगर - सरकार फक्त पडण्याला घाबरते, सरकारला तीच भाषा समजते, त्यामुळे पक्ष कोणतेही असो, जनजागृती करून जनता रस्त्यावर उतरली तरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार आहेत. त्यासाठीच लवकरच आपण दिल्लीतील रामलीला मैदानावर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. 'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अण्णांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला. रामलीला मैदान आंदोलनासाठी मिळावे म्हणून आपण दिल्ली कमिशनर यांना परवानगी मागितली आहे. साधारण महिनाभरात रामलीला मैदानावर आपण आंदोलन सुरू करू, असेही अण्णा म्हणाले.

प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची घेतलेली मुलाखत

आश्वासने न पाळणाऱ्या केंद्र सरकारवर अण्णा नाराज-

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी, कृषी माल, दूध, फळे, भाजीपाल्यासह सी-टू प्लस फिफ्टी प्रमाणे हमीभाव, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र संवैधानिक दर्जा आणि स्वायत्तता या प्रमुख मागण्यांसाठी अण्णांनी गेल्या चार वर्षांत दिल्लीतील रामलीला मैदान आणि त्यानंतर राळेगणसिद्धी येथे आंदोलने केली होती.

हेही वाचा -'जनतेच्या हितासाठीच नाईट कर्फ्यू; कोरोनाच्या नव्या विषाणूविषयी सरकार गंभीर'

2018 आणि 2019 ला केलेल्या या आंदोलनात केंद्रीय तसेच राज्यातील तत्कालीन कृषीमंत्री, मुख्यमंत्री यांनी मनधरणी करून आंदोलन मागे घ्यायला लावले. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या संमतीने पीएमओ, कृषीमंत्री आदीं विभागांनी आश्वासन देत सर्व मागण्या मान्य केल्याचे लिखित दिले. मात्र, आता दीड वर्षे उलटले तरी कोणत्याही आश्वासनाची अमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव उद्विग्न मनाने पुन्हा बेमुदत उपोषण करणे भाग पडत असल्याचे अण्णांनी खेदाने स्पष्ट केले.

सर्व पक्ष एकसारखे, त्यांना फक्त सत्ता हवी

सरकार काँग्रेसचे असो वा भाजपचे वा अन्य कोणाचे, कोणत्याही पक्षाला शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही. त्यांना फक्त पक्ष, सत्ता आणि पैसा यातच स्वारस्य असते. त्यामुळे समाजालाच आता रस्त्यावर उतरणे भाग आहे. त्यामुळेच जनजागृती आणि लोकशिक्षणासाठी आपण आंदोलन करणार आहोत. सत्तेतील कोणताही पक्ष केवळ आपले सरकार पडेल यालाच घाबरतो, त्यामुळे आता आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील, असे अण्णा म्हणाले.

हेही वाचा -मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बघायला श्रम आणि पैसे दोन्ही लागत नाहीत, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर अण्णांची सावध भूमिका

दिल्ली सीमेवरील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत अण्णांनी अधिक बोलण्याचे टाळले आहे. आपण एक दिवस उपोषण करून त्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, आपणही चार वर्षांपासून आंदोलन करत आहोत असे सांगताना कायदे करणे वा रद्द करणे यापेक्षा आपण केलेल्या मागण्या अंमलात आणल्या तर शेतकऱ्यांच्या समृद्धीचा तोच मार्ग असल्याचे अण्णांनी यावेळी सूचित केले.

Last Updated : Dec 23, 2020, 8:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details