महाराष्ट्र

maharashtra

'...म्हणून विदर्भ-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या जास्त'

By

Published : Jan 6, 2021, 3:22 PM IST

Updated : Jan 6, 2021, 3:30 PM IST

अण्णांनी एक पत्रकही प्रसिद्ध करून विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे मूळ कशात आहे हे कागदोपत्री स्पष्ट केले आहे.

anna hazare
anna hazare

अहमदनगर -महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणापेक्षा शेतकऱ्यांच्या अधिक आत्महत्या या विदर्भ आणि मराठवाड्यात होत आल्या आहेत. याला केंद्राचा कृषिमूल्य आयोग जबाबदार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. याबाबत अण्णांनी एक पत्रकही प्रसिद्ध करून विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे मूळ कशात आहे हे कागदोपत्री स्पष्ट केले आहे.

केंद्रीय कृषिमूल्य आयोग जबाबदार

राज्याचा कृषिमूल्य आयोग शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धानाचा हमीभाव काढून मंजुरीसाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाकडे पाठवते, मात्र केंद्रीय कृषिमूल्य आयोग राज्याने पाठवलेले हमीभावात वीस ते पन्नास टक्के कपात करून हमीभाव घोषित करते. यामुळे शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्याला मूळ खर्चही मिळत नाही, या कारणांमुळे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सातत्याने होत आहे, असा आरोप अण्णांनी केला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सी टू प्लस फिफ्टी असा फॉर्म्युला दिला आहे, यानुसार पिकांचा उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के पकडून हमीभाव ठरवला जाणे अपेक्षित आहे, मात्र सध्या मूळ खर्चा इतकी किंमतही हमीभाव म्हणून केंद्रीय कृषिमूल्य आयोग मंजूर करत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो असे ते म्हणाले.

'स्वामीनाथन' लागू करणे हाच उपाय

वास्तविक स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकारने मान्य केल्या असून त्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे कबूल केले आहे. प्रत्येक्षात मात्र या प्रमाणे अंमलबाजवणी होत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याने आपण आंदोलन करत असल्याचे अण्णांनी सांगितले आहे. अण्णांनी राज्य कृषिमूल्य आयोगाने केंद्राकडे गहू, ज्वारी, बाजरी, मूग, कापूस आदी पिकांची राज्य आयोगाच्या हमीभावाच्या शिफारशी आणि केंद्रीय आयोगाने मंजूर केलेले हमीभाव याची जंत्रीच जमा केली असून यातच केवळ शेतीवर अवलंबून असलेला विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत असल्याचे निदर्शनास आणले आहे. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने राज्य कृषिमूल्य आयोगाने निर्देशित केलेले हमीभाव किमान लागू केले तरी ठीक होईल,पण तसे होत नसल्याबद्दल अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Last Updated : Jan 6, 2021, 3:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details