अहमदनगर- जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्याने जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. त्यांनी निकालाबात समाधानही व्यक्त केले.
जळगाव घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे म्हणाले, कायद्यापुढे सर्व समान आहेत. मग तो कितीही मोठा असो...उशिरा का होईना, पण न्याय हा मिळतोच हे न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सिद्ध झाले आहे. ‘सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं’, असे सांगत त्यांनी भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याची आठवण सांगितली.
ते म्हणाले, या भ्रष्टाचार प्रकरणात आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा केला. जन आंदोलनाच्या माध्यमातून दीर्घकाळ संघर्षही केला. जैन यांच्यासह इतर भ्रष्ट मंत्र्यांची सरकार चौकशी करत नसल्याने मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण केले. त्यामुळे सरकारने माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचा चौकशी आयोग नेमून चौकशी केली. त्यात जैन यांचा गैरव्यवहार पुराव्यासह सिद्ध झाला असे हजारे म्हणाले.
प्रवीण गेडाम आणि इशू सिंधूचे अभिनंदन -
अण्णा हजारे म्हणाले, तत्कालीन महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह गेडाम यांनी धाडसाने गुन्हा दाखल केला. अधिकारी इशू सिंधू यांनी गुन्ह्याचा निष्पक्ष व धाडसाने सखोल तपास केला. गुन्ह्याची मुळापर्यंत उकल करून आरोपपत्र त्यांनी दाखल केले. या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. तसेच या खटल्यात न्यायालयात सरकारी बाजू प्रभावीपणे मांडणारे प्रविण चव्हाण यांना निकालाचे श्रेय जाते. त्यांचेही अभिनंदन करतो. या गुन्हाचा तपास एवढा प्रभावी झाला की तपासादरम्यान सुरेश जैन यांना साडेतीन वर्षे जेलमध्ये रहावे लागले, असेही अण्णा म्हणाले.