अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार तसेच माजी उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर 'सक्तवसुली संचलनालया'ने (ईडी) मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अण्णा हजारे यांनी याबद्दल गुरूवारी खुलासा केला. माझ्याकडे आलेल्या पुराव्यात अजित पवार व इतरांची या प्रकरणात नावे आली होती. मात्र, त्यात शरद पवार यांचे नाव नव्हते. पवारांचे नाव यात कसे आले हे आता ईडीच्या चौकशीतच बाहेर येईल, असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.
हेही वाचा - शरद पवार यांच्यावरील कारवाईचा औरंगाबाद राष्ट्रवादीकडून निषेध
राज्य सहकारी बँक प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले असून शुक्रवारी ते थेट ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात ईडीने ही कारवाई केल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिखर बँक घोटाळ्याची चौकशी आणि कारवाईची मागणी केलेल्या अण्णा हजारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी गोळा केलेल्या सहकारी कारखान्याच्या पुराव्यामध्ये शरद पवारांचं नाव कुठेही नसल्याचे ते म्हणाले. मात्र, संगनमत करून शिखर सहकारी बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, यावर ते ठाम आहेत.