अहमदनगर- अचानक महत्त्व प्राप्त झालेल्या जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची माळ अनपेक्षितपणे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांच्या गळ्यात पडली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी जिल्ह्यातील अर्धा डझनहून अधिक ‘मातब्बर’ पोलीस निरीक्षकांनी प्रशासनापासून ते राजकीय वरदहस्तापर्यंत सगळे मार्ग अवलंबत या नियुक्तीसाठी 'फिल्डिंग' लावली होती. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ठरवलेल्या निकषांचा अवलंब करत जिल्हा पोलीस दलात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्या या पदावर कटके यांची नियुक्ती केली आहे. हा आदेश जाहीर झाल्याबरोबर त्यांना पदभार स्विकारण्याचेही आदेश देण्यात आले असून शिर्डीचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्यावर आता शिर्डीसह कोपरगाव शहर व तालुका, अशा तीन पोलीस ठाण्याचा भार सोपविण्यात आला आहे.
पोलीस वर्तुळात होती मोठी उत्सुकता
गेल्या काही दिवसांपासून दररोज घडणार्या विविध घटनांमधून जिल्हा पोलीस दलात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) निरीक्षकांबाबत चर्चांचे फव्वारे उडत होते. पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षकांनी या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी मोठी लॉबिंगही केली असल्याचे बोलले जात होते. शिर्डी वाहतूक शाखेचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अभय परमार, राहुरीचे निरीक्षक मुकूंद देशमुख, शेवगावचे निरीक्षक रामराव ढिकले, श्रीगोंद्याचे निरीक्षक दौलत जाधव व नाशिक ग्रामीणमधून जिल्ह्यात आलेले संपत शिंंदे असे अनेक अधिकारी यासाठी दावेदार असल्याचे सांगितले जात होते.
गुन्हे शाखेसाठी अनेकांचे होते प्रयत्न
याच दरम्यान काही अधिकार्यांनी राजकीय उंबरठेही झिझवल्याने कधी नव्हे एवढे या शाखेच्या प्रभारीपदाला महत्व प्राप्त झाले होते. पोलीस वर्तुळातून दररोज एक नावाची चर्चा समोर येत असल्याने ‘एलसीबी’ची नियुक्ती म्हणजे चर्चा आणि खमंग गप्पांचा दिवाळी फराळच झाल्यासारखी स्थिती होती. त्यातच मध्यंतरीच्या काळात श्रीरामपूरातील गुटखा प्रकरण, नगरमधील डिझेल घोटाला, नेवासा पोलीस ठाण्यातील कर्मचरी आणि अतिरीक्त पोलीस अधीक्षकांमधील व्हायरल ऑडिओ संभाषण, संगमनेर पोलीस ठाण्यातील लाचखोरीचे प्रकरण आणि त्यात भरीस भर म्हणून अकोले पोलीस ठाण्यातील कथीत भ्रष्टाचाराची ऑडिओ क्लिप यामुळे जिल्हा पोलीस दलातील अंतर्गत वातावरण अत्यंत गढूळ झाले होते.
नूतन पोलीस अधीक्षकांनी दिला अनेकांना धक्का
त्याचवेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस दलाला बदनाम करणार्या कोणाही अधिकार्याची गय केली जाणार नसल्याचे सांगत श्रीरामपूर व नेवासा येथील निरीक्षकांची तात्काळ उचलबांगडी केली व अतिरीक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्याबाबतचा सविस्तर अहवालही विशेष पोलीस महानिरीक्षकांना सोपवला. त्यावरुन जिल्हा पोलीस प्रमुखांची कार्यपद्धती अधोरेखीत झाल्याने संपूर्णतः त्यांच्याच अधिकारात असलेल्या एलसीबीच्या निरीक्षकपदासाठी येत असलेला प्रशासकीय व राजकीय दबाव ते सहज झुगारतील असा काहीसा अंदाज आला होता. त्यावर त्यांच्याच आदेशाने आज शिक्कामोर्तब झाले आहे. सुरुवातीपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या स्पर्धेतच नसलेल्या अनिल कटके यांना एलसीबीचा पदभार देण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आपल्या या धडाकेबाज निर्णयातून या पदासाठी गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून जंग जंग पछाडणार्या जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांना एकप्रकारे कठोर संदेशच दिला आहे. एलसीबीसाठी नियुक्ती झालेले अनिल कटके यापूर्वी संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणूनही कार्यरत होते. सध्या ते कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावित होते. त्यांच्या नियुक्तीने गेल्या मोठ्या कालावधीपासून सुरु असलेल्या ‘एलसीबी’ प्रभारी नियुक्तिच्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे महत्व
गुन्हेगारी प्रवृत्तींना नियंत्रणात ठेवण्यासोबतच राजकीय नेते व त्यांचे कार्यकर्ते यांना नियंत्रणात ठेवण्याची वेगळी धाटणी असलेला अधिकारी, अशी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची वेगळी ओळख आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याच्या सर्व परिणामांचा विचार करण्याची त्यांची कार्यशैली पोलीस खात्यासाठी वेगळी आहे. प्रकरणाच्या मुळाशी जावून उकल करण्यात त्यांचा हातखंडा असल्याने काहीशा विलंबाने का होईना मात्र जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला सक्षम अधिकारी लाभल्याने पोलीस वर्तुळासह सामान्य नागरिकांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.