शिर्डी -साईबाबांच्या मंदिरावरून गुरुवारी दुपारी चार वाजता एका हेलिकॉप्टरनं प्रदक्षिणा घातल्यानं मोठी खळबळ उडालीये. निळ्या रंगाच्या या हेलिकॉप्टरनं साईमंदिराच्या सुर्वण कळसाजवळून फेरी मारल्याचं दिसून आलयं. ही घटना नेमकी त्यावेळी घडली ज्यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी शिर्डी साई मंदिराला भेट दिली.
गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान निळ्या रंगाचे हेलिकॉप्टर साईबाबा मंदिराच्या सुर्वण कळसाला फेरी मारून गेलं. यावेळी मोठा आवाज येत असल्यानं स्थानिकांनी आकाशात पाहीलं तर हेलिकॉप्टर दिसून आलं. या हेलिकॉप्टपचे चित्रीकरण देखील करण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर अगदी खालून गेल्याने त्याचा मोठा आवाज आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
'त्या' हेलिकॉप्टरच्या चौकशीची मागणी
साई मंदिराच्या वर विशिष्ट अंतरावरून कोणतीही वस्तू उडवली जावू नये असा नियम असून, साईसंस्थानला देखील माहितीपट तयार करताना ड्रोनसाठी जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली होती. तेव्हा अशा प्रकारे हेलिकॉप्टरनं मंदिराला प्रदक्षिणा घालणे चुकीचे आहे. साईमंदिर हे आंतराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असून, येथे नेहमीच गर्दी असते अशावेळी मंदिराच्या वरून गेलेल्या हेलिकॉप्टरची चौकशी व्हावी अशी मागणी साईसंस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी केली आहे.
साईबाबा मंदिराच्या कळसाला अज्ञात हेलिकॉप्टरनं मारली प्रदक्षिणा हेलिकॉप्टरमध्ये राजकीय नेता असल्याची चर्चा
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ प्रताप दिघावकर हे दुपारच्या वेळी साईमंदिरालगत उभारलेल्या पोलीस चौकीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्याचवेळी हा प्रकार घडलाय. मंदिराच्या वरून हेलिकॉप्टरनं फेरी मारल्याची बाब दिघावरकर यांना लक्षात आणून दिल्यानंतर आपण याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा करून, पुढील कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान या हेलिकॉप्टर मध्ये कोणीतरी राजकीय नेता असल्याची चर्चा सुरू आहे.