अहमदनगर - अकोले तालुक्यात कालपासून पाऊस सुरू आल्याने मुळा नदीच्या उगमावर असलेल्या आंबित धरण काल शुक्रवारी सकाळी 11 वाजता ओव्हर फ्लो झाले आहे. 193 दशलक्ष घनफुट साठवण क्षमतेचे आंबित धरण शुक्रवारी सकाळी 11 वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. यामुळे मुळा नदी वाहती झाली आहे. धरणातून 300 क्युसेकचा विसर्ग मुळा नदीत सुरू आहे. मुळा नदी पात्रात विसर्ग सुरु झाल्याने कोतुळ येथील मुळा नदीवर 600 दलघफु क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. गत वर्षी आंबित धरण 9 जूनला भरले होते. यावर्षी 11 जूनला भरले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा पाणलोटात गत दोन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असून रिपरिप पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ओढे-नाले आता खळखळू लागले असून धरणात विसावू लागले आहेत. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 19 दलघफू पाणी दाखल झाले आहे. या धरणातून विद्युत गृह क्रमांक 1 मधून 840 ने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे 60 दलघफू पाण्याचा वापर झाला आहे. या धरणात काल सकाळी 5396 दलघफू पाणीसाठा होता. तो आज 5352 दलघफू पर्यंत खाली आला होता. काल दिवसभरही अधूनमधून रिपरिप सुरू होती. या पावसाची नोंद 7 मिमी झाली आहे. पडणार्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी शेती कामांत गुंतला आहे.