शिर्डी(अहमदनगर) - सध्या महाराष्ट्रातील राजकारण बदलत चालले आहे. राज्यात काहीजण अचानक बाहेर निघतात आणि अचानकच भोंगे बंद (Masjid Loudspeakers) करण्याची भाषा करतात. मग हे एवढे दिवस काय झोपा काढत होते का?, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह भाजपला लगावला आहे. अशाच वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणायच्या व विकासाला महत्त्व देण्याऐवजी वेगळी चर्चा समाजात घडवून आणायची, समाजात दरी कशी निर्माण होईल याकडे लक्ष दिले जाते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
भोंग्यांच्या गोष्टी करून विकास होत नाही - आपण किती वर्षांपासून महाराष्ट्रात गुन्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करत आहोत. एकमेकांना शुभेच्छा देत आहोत. ही आपली संस्कृती आणि हीच आपली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. शाहू-फुले-आंबेडकरांनी हाच विचार मांडला आहे. अशा भोंग्यांच्या गोष्टी करून विकास होत नाही, अशी टीकाही राज ठाकरे यांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.