महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 5, 2020, 2:22 PM IST

ETV Bharat / state

खेलो इंडियातील सुवर्णपदक विजेतीला प्रतीक्षा आहे मदतीची

सोनाली मंडलिक एक उमदी कुस्तीपटू आहे. खेलो इंडिया स्पर्धेमध्ये तिला सुवर्णपदकही मिळाले आहे. इतर अनेक स्पर्धांमध्ये तिने उज्वल यश मिळवले आहे. सोनालीच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने तिच्या आहाराची आबळ होत आहे. यासाठी तिला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

Sonali Mandlik
सोनाली मंडलिक

अहमदनगर - राज्यातील सर्वात मोठा आणि केंद्रभागी असलेला जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. प्रतिभावंतांची कमी नगर जिल्ह्यात नाही मात्र, तरीही जिल्हा काहीसा दुर्लक्षितच राहिला आहे. अनेक प्रतिभावंत मुले-मुली मदतीविना दुर्लक्षित राहिले आहेत. अशीच एक होतकरू कुस्तीपटू कर्जत तालुक्यातील कापरेवाडी या गावात राहत. सोनाली मंडलिक असे या नगरच्या 'गीता फोगट'चे नाव आहे.

सोनाली मंडलिक या कुस्तीपटूला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे

सोनाली मंडलिक एक उमदी कुस्तीपटू आहे. खेलो इंडिया स्पर्धेमध्ये तिला सुवर्णपदकही मिळाले आहे. इतर अनेक स्पर्धांमध्ये तिने उज्वल यश मिळवले आहे. कोरोनाच्या काळात तालुक्याच्या ठिकाणी होणारा तिचा सराव थांबला. मात्र, सोनालीप्रमाणेच जिद्दी असलेल्या तिच्या वडिलांनी हार मानली नाही. त्यांनी पत्राच्या शेडमध्ये तिच्यासाठी कुस्तीचा आखाडा तयार केला. सध्या सोनाली गावातच सराव करत आहे.

सोनालीची पंचक्रोशीत कीर्ती आहे. परिसरातील अनेक खेळाडू तिच्याकडून प्रेरणा घेत आहेत. तिच्या सोबत सराव करण्यासाठी हे खेळाडू थेट कापरेवाडीत येतात. सोनालीचे प्रशिक्षकही कठीण परिस्थितीत तिच्यावर मेहनत घेत आहेत. सोनालीसमोर सध्या एका कुस्तीपटूसाठी आवश्यक असणाऱ्या खुराकाचा प्रश्न आहे. महिन्यात वीस हजारांपेक्षा जास्त किमतीचा योग्य आहार कुस्तीपटूला मिळायला हवा. मात्र, सोनालीच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्याने तिच्या आहाराची आबळ होत आहे. यासाठी तिला शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.

सोनाली वयाच्या पाच वर्षांपासून कुस्तीसाठी मेहनत घेत आहे. घरची परस्थिती हलाखीची असतानाही तिचे वडील तिच्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2024च्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे सोनालीचे स्वप्न आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details