अहमदनगर -राहुरी महसूल प्रशासनाच्या संशयित कारभाराला कंटाळून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी ‘हे राम’ म्हणत स्मशानभूमीत सरण रचून त्यावर बसून धानोरे (ता. राहुरी) येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीपात्रातून सुमारे 74 लाखांची वाळू तस्करी झाल्यानंतर संबंधित वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे आश्वासन महसूल प्रशासनाकडून दिले. मात्र, वर्ष उलटले तरी वाळू तस्कर आणि त्यांना पाठीशी घालणार्या 'महसूल'च्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी हा अनोख्या उपोषणाचा पवित्रा घेतला.
आज उपोषणाचा दुसरा दिवस असून वाळूचोरी प्रकरणातील दोषी महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत स्मशानातील बेमुदत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. प्रवरा नदीपात्रातून गेल्या काही वर्षांपासून खुलेआम अनधिकृत वाळू उपसा केला जात असल्याने याच वाळू प्रकरणी गेल्यावर्षी बापू दिघे यांनी उपोषण केले होते. त्यावेळी महसूल विभागाच्या अधिकार्यांनी नदीपात्रातील चोरीस गेलेल्या वाळूचा पंचनामा केला. त्यात सुमारे 74 लाखांची वाळू चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधित वाळू तस्कर व महसूल कर्मचार्यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन राहुरीच्या तहसीलदारांनी दिले होते. मात्र, वर्ष उलटूनही अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही.
हेही वाचा -गांधी जयंती दिनी स्मशानभूमीत आंदोलन; महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी