अहमदनगर- देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिले लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मंदिरे बंद करण्यात आली होती. मिशन बिगीन अगेनच्या पहिल्या टप्प्यात देशातील सर्व मंदिरे उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने राज्यातील मंदिरांना खुले करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मंदिरांच्या विश्वस्तांनी मंदीर सुरू करण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच दीनदयाळ परिवाराचे वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी न दिल्यास आंदोलनाचा इशारा
अहमदनगरमधील मंदिरे न उघडल्यास आंदोलन करण्याची भूमिका जिल्ह्यातील मंदिर विश्वस्तांनी घेतली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यात शिर्डी, शनी शिंगणापूर, आचार्य आनंदरुषी, अवतार मेहरबाबा, नावनाथांची संजीवनी समाधी मंदिरे आहेत. हे सर्व मंदिरे तीन महिन्यांपासून बंद आहेत. केंद्राने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र ठाकरे सरकार का परवानगी देत नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
शासनाचे फिजिकल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुले करणे गरजेचे आहे. सरकारने तातडीने हा निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या विश्वस्तांनी दिला आहे.