अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील निंभारी या खेडेगावात राहणारा युवराज पवार हा युवक मॅकेनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. देशात कोरोना संकट आणि आर्थिक मंदी असल्यामुळे नोकऱ्यांना बसत चाललेली खिळ लक्षात घेवून या युवकाने उद्योजक होण्याचा निर्धार केला आहे. आपल्या वडिलांच्या लहानशा वर्कशॉपमध्ये लहानपणापासून युवराज काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असे. नवनवीन अत्याधुनिक शेती अवजारे तयार केल्याने वडिलांनी देखील त्याला पाठबळ दित होते. त्यांने यातून प्रेरणा घेऊन आता इलेक्ट्रिक विंटेज कार बनवली ( student built battery powered electric vintage car ) आहे.
इलेक्ट्रिक विंटेज कार - लॉकडाऊनच्या मागील दोन वर्षात त्याने सुरुवातीला पेट्रोलवर चालणाऱ्या दोन विंटेज कारची निर्मिती केली. या कारला त्याला भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तो इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीकडे वळाला आहे. साधारण दोन महिने परिश्रम घेत त्याने 'पवार ब्रदर्स हिस्टोरिकल मोटार' या नावाने 'युवराज 3.0' ही इलेक्ट्रिक विंटेज कार तयार केली आहे.
कारची डिझाईन इंग्रजाच्या काळातील वाहनांसारखी - रस्त्यावर धावताना लक्झरी कारमधील व्यक्तीच्या देखील माना आपोआप मागे वळतात. प्रथमदर्शनी अगदी मनात भरणारी, अशी या कारची डिझाईन आहे. लोस्पीड आणि हायस्पीड अशा दोन वेगात ती धावू शकते. एकाच वेळी चार व्यक्ती अगदी आरामात या कारमध्ये बसून प्रवास करु शकतात. हेडलाईट, पार्किंग, वळण्यासाठी इंडिकेटर, स्टॉप इंडिकेटर अशा सुविधा यात देण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे बॅटरी बचत व्हावी म्हणून एलईडी लाइट्स यात वापरण्यात आले आहे. करमणुकीसाठी साऊंड सिस्टम देखील यात आहे. जमिनीपासून 222 सेमीचे अंतर असल्याने कुठल्याही रस्त्यावर धावण्यासाठी पुरिपुर्ण आहे. कारची डिझाईन इंग्रजाच्या काळातील वाहनांसारखी आहे. तर या कारचे पेटेंट त्याने नोंदवले आहे.
सर्वसामान्यांसाठी राजा-महाराजांचा फिल -जवळपास शंभर वर्षापूर्वी राजा महाराज तसेच गर्भ श्रीमंत व्यक्तींकडे अशा कार दिसत असे. देशात अगदी तुरळक व्यक्तींकडे कार असल्याने एक वेगळी छाप होती. सध्याच्या काळात काही शौकीन व्यक्तींकडे विंटेज कार दिसून देतात. यात बड्या असामींनी आपल्या कारच्या संग्रहात विंटेज कार ठेवल्या आहेत. मात्र आता युवराजच्या या कार निर्मितीमुळे हे फिल सर्वसामान्य व्यक्तीला देखील मिळू शकणार आहे. अत्यंत कमी किमतीत आणि सर्व सामान्य व्यक्तींना परवडेल, अशी या कारची किंमत असून दैनंदिन वापरता सुध्दा तीचा वापर करणे सहज शक्य आहे.