अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बाळ बोठे अद्याप फरार आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला आहे. अखेर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना साद घातली आहे. बोठेबाबत काही माहिती असल्यास ती आम्हाला द्या, असे आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले बोठेच्या घराची तीनदा झडती -
आरोपी बाळ बोठे याच्या घरी आणि ऑफिसमध्ये आतापर्यंत तीनदा झडती घेण्यात आली आहे. त्या ठिकाणी काही ठोस पुरावे मिळाले असून आता आरोपी बोठेच्या ठिकाणाबाबत माहिती मिळवण्यास पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिसांची पाच पथके जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर त्याचा शोध घेत आहे. तो नाशिकमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलीस तिथे पोहचण्या अगोदरच तो तेथून फरार झाला होता.
पोलिसांना विश्वास -
लवकरात लवकर आरोपीला अटक करू, अशा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, नागरिकांना देखील आवाहन आहे, याबाबत कुठलीही माहिती असेल, तर निश्चित पोलिसांना द्या. या संदर्भात गोपनीयता पाळली जाईल, पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले.
आज जामीन अर्जावर सुनावणी -
बाळ बोठेच्यावतीने वकिलांमार्फत अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यावर पोलिसांनी बोठे याला सुनावणी वेळी हजर राहण्यास सांगावे, असा विनंती अर्ज कोर्टाला केला आहे. या दोन्ही अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे बोठे कोर्टात हजर राहणार का किंवा त्याच्या जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय देते याकडे पोलीस आणि नागरिकांचे लक्ष लागून आहे.
बाळ बोठेने दिली होती सुपारी -
पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील घाटात 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा आणि सुपा पोलिसांकडून तपास सुरू होता. हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्या आरोपींनी बाळ बोठेने त्यांना सुपारी दिल्याचे कबुल केले होते.