अहमदनगर -साई बाबांचा दर्शानासाठी विमानाने शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डी विमानतळावर आता नाईट लँडिंग सुविधाही सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता भाविकांना रात्री शिर्डीला विमानाने येणे शक्य होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश तसेच विदेशातील विमानसेवा सध्या बंद करण्यात आल्या आहेत. या पुन्हा सुरू होताच शिर्डीच्या विमानतळावर रात्रीही विमाने उतरु शकतील, या दृष्टिने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तयारी केली असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री यांनी 'ईटीव्ही भारत'ला बोलताना दिली.
शिर्डी विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री बोलताना... साई बाबांच्या दर्शानासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांची सुविधेसाठी राहाता तालुक्यातील काकडी या गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात आले. त्याला 1 ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. हे विमातळ आंतरराष्ट्रीय असले तरी, या ठिकाणी सुविधा मात्र जशा पाहिजेत तशा नसल्याने त्या आता हळूहळू उभारल्या जात आहे. लॉकडाउन होण्यापूर्वी शिर्डी विमानतळावर देशभरातील अनेक राज्यातून तीस विमान ये-जा करत होते. यामुळे अनेक विकास काम करण्यास अडचणी येत असल्याने या कामाना आता लॉकडाउन काळात गती देण्यात आली आहे. त्यात आता प्रामुख्याने विमानतळ नाईट लँडिंग सेवेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती शिर्डी विमानतळ संचालक दिपक शास्री यांनी दिली. शिर्डी विमानतळावर रात्री विमाने ये-जा सुरु झाल्यास विमानांसाठी विमानतळांचे भाडे आणि प्रवासी तिकीट देखील कमी होण्यास मदत होणार आहे. लेट नाईट लँडिंगमुळे विविध महानगरातून शिर्डी येथून विमानसेवा सुरू होतील. त्यामुळे विमानांच्या फे-या आणि प्रवाशांची संख्याही वाढेल. येथे विमानांचे पार्किंग तसेच बस स्टेशनची सुविधा सुरू होईल. विमानतळाचे उत्पन्न वाढेल, याच बरोबरीने सध्या विमाने उभी करण्यासाठी येथे चार बे चे पार्किंग आहेत. आणखी चार बे चे काम अंतिम टप्प्यात आहेत. आठ विमानांसाठी पार्किंग सुविधा तयार होवून विविध कंपन्यांना विमाने पार्किंगसाठी शिर्डी विमानतळावर जागा निर्माण होणार आहे.