अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे येत्या 20 डिसेंबर पासून मौनव्रत धारण करणार आहेत. निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीस विलंब होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आज (गुरूवारी) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. गेल्या 9 डिसेंबरला अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 10 डिसेंबरला राष्ट्रपती कोविंद यांना याविषयी पत्र पाठवले होते. त्यांनी निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांच्या फाशीच्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी केली होती. अन्यथा आपण मौनव्रत धारण करू आणि पुढे जाऊन उपोषण आंदोलन करू, असा इशाराही दिला होता.
'दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन 7 वर्षे उलटली. मात्र, तरी अजूनही आरोपींना शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचे जनतेने स्वागत केले आहे. न्याय मिळण्यास उशीर होत असताना याबाबत सरकारची उदासीनता चिंतित करणारी आहे. यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत,' असे त्यांनी प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे.