अहमदनगर - रेखा जरे खून प्रकरणी प्राथमिक दर्शनी हा अपघाताचा बनाव असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र कोणत्या कारणासाठी हा खून करण्यात आला आहे, याबाबत पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. या प्रकरणी सुरुवातीला तीन आरोपींना अटक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी अजून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र अद्याप मास्टरमाईंडचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 'रोड रेस'चा बनाव करून यामागे हत्येचा उद्देश असू शकतो, या निष्कर्षाने पोलीस पुढील तपास सुरू आहे.
अहमदनगर : 'हे पूर्वनियोजित हत्याकांड'... रेखा जरे हत्या प्रकरणावर पोलिसांचा खुलासा तिघांना पोलीस कोठडी
दरम्यान बुधवारी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना पारनेर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. या प्रकरणी पारनेर न्यायालयाने आरोपींना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी शनेश्वर उर्फ गुड्डू शिंदे (कोल्हार), फिरोज शेख (श्रीरामपूर), आदित्य चोळके (राहुरी) अशी पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी मंगळवारी विविध ठिकाणाहून तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांना बुधवारी दुपारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. मनिषा डुबे यांनी आरोपींच्या दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने तिघांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.
धक्कादायक माहिती पुढे येणार
पोलीस तपासात आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे़. नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाट्याजवळ सोमवारी रात्री रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेक-यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. बुधवारी पूर्ण दिवस जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा, सुपा पोलीस स्टेशनचे विशेष पथक या प्रकरणामागील मास्टर माईंडच्या शोधात होते.
आरोपींनी ही हत्या सुपारी घेऊन केल्याचे कबूल केले असल्याचे समजते. त्यातून मास्टरमाउईंड कोण, यावर बुधवारी नगर जिल्ह्यात दिवसभर चर्चा सुरू होती. संशयित मास्टर माईंडच्या घरापर्यंत पोलीस पोहचल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्याचे टाळले आहे.
'रोड रेस'च्या बनावाखाली हत्या
रेखा जरे या पुण्याहून नगरकडे परत येत असताना वाटेत जातेगावं घाटात मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांची चारचाकी आडवली. यानंतर गाडीचा आरसा दुचाकीला घासल्याचे सांगत हुज्जत घातली. यानंतर जरे यांच्याशी वादावादी सुरू करून अचानक त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. यानंतर आरोपी पुण्याच्या दिशेने फरार झाले. मात्र यातील एकाचा फोटो रेखा जरे यांच्या मुलाने काढला होता. त्याच्या आधारावर प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. यानंतर पोलिसांनी चोवीस तासात तीन आरोपींनी अटक केली. तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली देताना संबंधित हत्या सुपारी घेऊन केल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी या घटनेबाबत अजून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यात विशेषतः 'माध्यम' आणि राजकीय वर्तुळात या घटनेबाबत चर्चांना उधाण आले आहे.